सहाव्या रसाध्यायात मुनींनी पुन्हा विचारलेल्या पाच प्रश्‍नांना अनुलक्षून प्रथम नाट्याची रस, भाव इत्यादी अकरा अंगे व त्या प्रत्येक अंगाचे भेद यांचा नामनिर्देश करून पुढे रसाच्या स्वरूपाचे विवेचन केले आहे आणि नंतर शुद्ञार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स आणि अद्भुत या आठ रसांचे
स्थायिभाव, विभाव, अनुभाव आणि व्यभिचारिभाव यांचे विवेचन केले आहे. हे करताना प्रायः गद्याचा उपयोग केला असून विवेचनाला पुष्टी देण्यासाठी परंपरेने आलेले आनुवंड्य श्लोक अथवा आर्या उद्धृत केल्या आहेत.

भावव्यज्ञक नावाच्या सातव्या अध्यायात प्रथम भाव, विभाव व अनुभाव यांच्या स्वरूपाचे विवेचन असून नंतर रति, हास वगैरे आठ स्थायिभाव, निर्वेद, ग्लानि वगैरे तेहतीस व्यभिचारिभाव आणि स्तम्भ, स्वेद, रोमांच वगैरे आठ सात्त्विक भाव यांचे वर्णन आहे. ह्या वर्णनात प्रत्येक भावाचे विभाव (उत्पन्न होण्याची कारणे) व अनुभाव (त्याचे होणारे परिणाम) यांचा निर्देश आहे. या विवेचनातही मुख्यतः गद्याचाच उपयोग केला असून प्रत्येक वेळी परंपरागत आर्या उद्धृत केल्या आहेत. सहा आणि सात या दोन अध्यायांच्या रचनेचे स्वरूप इतर अध्यायांहून बर्‍याच अंशी भिन्न आहे.