प्राचीन ग्रीक समाजात इ. स. पू. सातव्या-सहाव्या शतकांत  डायोनायसस ह्या ऋतुदेवाच्या उत्सवप्रसंगी अजबली देण्याची प्रथा होती. सुफलताविधीशी संबंधित असलेल्या डायोनायसस देवाच्या वेदीवर बळी दिलेल्या बोकडाभोवती म्हणावयाचे गाणे म्हणजे अजगीत. डायोनायससच्या पूजाविधिप्रसंगी ‘ डिथिरॅम ’नामक वृंदगीते गायिली जात, त्यांत उत्स्फूर्तपणे काही वक्तव्ये केली जात, त्यांतून शोकांतिका हा प्रकार उत्क्रांत झाला असावा. शोकांतिकेचे आद्य स्वरूप प्राय: वृंदगानात्मक (कोरस) होते. पुढे इ. स. पू. सहाव्या शतकात थेस्पिस ह्या ग्रीक नाटककाराने त्या कोरसमधूनच एक पात्र नट म्हणून पुढे आणून त्याला संभाषण करावयास दिले. त्यामुळे ह्या गानप्रकाराचे रूपांतर नाट्यप्रकारात झाले. म्हणून थेस्पिस हा ग्रीक नाटककार शोकांतिका ह्या प्रकाराचा आद्य प्रणेता मानला जातो.

पुढे इ. स. पू. पाचव्या शतकात, ग्रीक संस्कृतीच्या उत्कर्षकाळात शोकांतिका ह्या प्रकाराचे विकसित व समृद्घ रूप पाहावयास मिळते. त्या काळी डायोनायससच्या उत्सवप्रसंगी शोकांतिकांच्या स्पर्धा घेतल्या जात, त्यांतून ह्या नाट्यप्रकारास चालना मिळाली. एस्किलस (इ. स. पू. ५२५-४५६), सॉफोक्लीझ (इ. स. पू. ४९६-४०६) आणि युरिपिडीझ (इ. स. पू. सु. ४८०-४०६) ह्या नाटककारांनी शोकांतिका ह्या प्रकाराला विकसित व परिपूर्ण रूप देणाऱ्या नाट्यकृती निर्माण केल्या. एस्किलसने तत्कालीन रूढ नाट्यप्रकारात आणखी एका पात्राची भर घातली. त्यामुळे शोकांतिकेतील पात्रांची संख्या एकावरून दोनावर गेली व त्यांच्यांत संवाद व संघर्ष आला. त्यामुळे एस्किलस हा ग्रीक नाटककार शोकांतिकेचा खऱ्या अर्थाने जनक मानला जातो. त्याने ग्रीकक शोकांतिकेला नेटके व कलात्मक रूप प्राप्त करून दिले. नेपथ्य व रंगभूषा ह्यांतही त्याने बदल घडवून आणले. गायकवृंदातील गायकांची संख्या कमी करून त्याने गाण्यापेक्षा संवादांना अधिक महत्त्व दिले. एस्किलसचे ओरेस्टेइआ (इ. स. पू. ४५८) हे त्रिनाट्य (ट्रिलॉजी) प्रसिद्घ असून, त्यात ॲगमेम्नॉन, केरोफे (इं. शी. लिबेशन बेअरर्स) व युमेनिडीझ ह्यातीन शोकांतिकांचा समावेश होतो. सॉफोक्लीझ ह्या श्रेष्ठ ग्रीक नाटककाराच्या सात शोकांतिका उपलब्ध आहेत. त्यांपैकी अँटिगॉन, ईडिपस टिरॅनस, इलेक्ट्रा, अजॅक्स, ईडिपस ॲट कलोनस इ. प्रसिद्घ असून ईडिपस टिरॅनस ही सर्वश्रेष्ठ शोकांतिका मानली जाते. परिपूर्ण ग्रीक नाट्यकृती म्हणून ॲरिस्टॉटलने ती गौरविली. ग्रीक शोकांतिकेत सॉफोक्लीझने तिसऱ्या नटाची भर घातली, त्यामुळे नाट्यरचना गुंतागुंतीची झाली. सॉफोक्लीझने प्रत्येक शोकांतिकेत स्वतंत्र व परिपूर्ण कथानके मांडण्याची प्रथा रूढ केली. त्यापूर्वीच्या त्रिनाट्यात एकच कथानक तीन नाटकांतून क्रमश: मांडण्याची पद्घत होती, त्या पार्श्वभूमीवर हे वैशिष्ट्य ठळकपणे उठून दिसते. सॉफोक्लीझच्या नाट्यरचनेत तंत्राची सफाई व कलात्मकता विशेषत्वाने जाणवते. त्याने नेपथ्यातही विकास घडवून आणला. युरिपिडीझ ह्या नंतरच्या श्रेष्ठ शोकांतिकाकाराने कथावस्तूत अधिक वैविध्य आणले. नाट्यरचना व भाषा यांतही महत्त्वाचे बदल घडवून आपल्या शोकांतिकांद्वारा वास्तवाची नवी जाण त्याने ग्रीक रंगभूमीवर निर्माण केली.