भरतमुनींच्या “नाट्यशास्त्र” या अभिजात संस्कृत ग्रंथातील नाटक व नाट्यशास्त्रविषयक अध्याय १८ व १९ चे प्रस्तुत भाषांतर अभिनवगुप्ताच्या “अभिनवभारती” टीकेसह प्रा. र. पं. कंगले, मुंबई यांनी मंडळास करून दिले आहे. नाट्याचे प्रकार, व्याख्या व रचना यासंबंधीचे विवेचन भरतमुनींनी केले आहे. “दशरूपनिरूपणम्” नामक अध्याय १८ मध्ये नाटक, प्रकरण वगैरे रूपकाच्या दहा प्रकारांचे वर्णन केले आहे.*“इतिवृत्त*नामक अध्याय १९ मध्ये कथानकाचा विचार केला आहे. कथानकाच्या अवस्था, अर्थप्रकृती, सन्धी, संघ्यंगे, संध्यंतरे, पताकास्थान इत्यादींचे विवेचन केले असून शेवटी नाटकात सर्वप्रकारच्या लोकस्वभावाचे दर्शन घडवावे असे सांगून नाटकाच्या रचनेविषयी काही सूचना केल्या आहेत.
भरताच्या नाट्यशास्त्रात ज्या अनेक विषयांचे विवेचन आहे त्यांपैकी नाटक, प्रकरण आदी रूपकांचे प्राधान्य निर्विवाद आहे. कारण नटांच्या द्वारा रंगभूमीवर प्रस्तुत केले जाणारे जे नाट्य ते मुख्यत्वेकरून ह्या रूपकांच्या प्रयोगाशीच संबद्ध आहे. इतर बहुतेक विषय ह्या नाट्यप्रयोगाच्या संदर्भात अनुषंगाने आले आहेत. तेव्हा रूपकांच्या विवेचनाला ह्या ग्रंथात महत्त्वाचे स्थान असावे यात आश्चर्य नाही.
रूपकाच्या नाटक, प्रकरण इत्यादी दहा प्रकारांचे विवेचन नाट्यशास्त्राच्या अठराव्या अध्यायात केले असून एकोणविसाव्या अध्यायात त्याच्या कथानकाची घडण व मांडणी यासंबंधी विचार केला आहे. रूपक शब्दाची व्याख्या नाट्यशास्त्रात कोठे केली नाही. किंबहुना, ज्या काव्याच्या गुण, अलंकार, लक्षण आदी विशेषांचे विवरण अगोदरच्या अध्यायांत केले आहे ते काव्य म्हणजेच रूपक हे नाट्यशास्त्रात गृहीत धरले आहे. अभिनेय म्हणजे अभिनयद्वारा व्यक्त होऊ शकणारे रूपकाच्या स्वरूपाचे काव्य आणि अनभिनेय असे इतर काव्य यांमध्ये नाट्यशास्त्रावरील टीकाकारांनी केलेला भेद भरताने उपेक्षिला आहे. दहा रूपकांची उत्पत्ती वृत्तींपासून झाली हे स्पष्ट करताना त्याने असे म्हटले आहे की वृत्ती सर्वच काव्याच्या मातृस्थानी आहेत (१८-४). पण काव्य म्हणजे नाटकादी रूपकप्रकार असेच त्याला सर्वत्र अभिप्रेत आहे.