रशियन  रंगभूमीने नाट्य-निर्मितीच्या क्षेत्रात केलेले प्रयोग रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले आहेत. स्तानिस्लावस्कीने प्रवर्तित केलेली अभिनयाची नवीन दर्शनपद्धती अमेरिकन व इंग्लिश नाट्यक्षेत्रात अद्यापही बरीच प्रचारात आहे. स्तानिस्लावस्कीने नवनाट्याला पोषक होईल अशा विकासासाठी स्वतःची मानस तांत्रिक अभिनयपद्धती निर्माण करून नटांना तिचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. स्तानिस्लावस्कीने ”An Actor Prepares” आणि “Building a character” या दोन उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती करून जगाच्या एतद्विषयक वाड्मयात फार मोलाची भर घातली आहे. भक्तिभावाने एखाद्या कलेचा नुसता जयघोष करीत राहणे आणि त्या कलेच्या प्रेमाला ज्ञानाची, विचाराची आणि परिश्रमाची जोड देऊन  तिच्या प्रगतीसाठी धडपडणे यांतील तफावत वरील दोन ग्रंथांतून त्याने निदर्शनास आणून दिली आहे.

स्तानिस्लावस्कीच्या  “An Actor Prepares” या ग्रंथाचा श्री. के. नारायण काळे यांनी केलेला मराठी अनुवाद “अभिनय साधना” या नावाने १९७१ साली प्रकाशित झाला. आता याच ग्रंथाचा पूरक भाग असलेल्या “Building A Character” या ग्रंथाचा श्री. के. नारायण काळे यांनीच केलेला मराठी अनुवाद “भूमिका शिल्प” या नावाने मराठी वाचकांना, विशेषतः नवनाट्याचे अभ्यासक, कलाकार, रंगभूषाकार, वेषभूषाकार या सर्वांनां उपयुक्त आहे.