शेक्सपिअरच्या जन्माला इ.स. १९६४ मध्ये ४०० वर्षे पूर्ण झाली. त्या वर्षी सर्व जगभर झालेल्या उत्सवावरून या अद्वितीय नाटककाराची मोहिनी जनमानसावर किती आहे हे दिसून आले. प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणावर त्याचे वाड्मय व चरित्र याबद्दल चर्चा करण्यात आली. इंग्लिज्ञ बोलणाऱ्या देशांत व विशेषतः इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांत गौरवग्रंथ निर्माण झाले, शेकडो व्याख्याने, परिषदा वगैरे कार्यक्रम घडून आले व आधीच जगप्रसिद्ध असलेल्या या साहित्यसम्राटाची कीर्ती सामान्य लोकांच्या कानांवरही सारखी पडत राहिली. शेक्सपिअरबद्दल आतापर्यंत निरनिराळ्या देशांतून व भाषांतून इतके लेखन झाले आहे की त्या लेखनानेच अनेक मोठी ग्रंथालये भरू शकतील. केवळ शेक्सपिअरचे ग्रंथ व त्यांवरील वाङमय याकरिता स्वतंत्र ग्रंथालये अनेक देशांत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फक्त शेक्सपिअरच्या वाङमयाची चर्चा करणारी अनेक नियतकालिकेही आहेत. इंग्लंडमध्ये दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या Shakespeare Survey  सारख्या उच्च दर्जाच्या पुस्तकांत शेक्सपिअरसंबंधी चाललेल्या संशोधनाचा आढावा, नवीन ग्रंथांची परीक्षणे, इतर भाषांतील संशोधन वगैरे सर्व गोष्टींचा उल्लेख असतो. अश्याच तर्‍हेची बरीच नियतकालिके अमेरिका, जर्मनी इत्यादी देशांतही वर्षानुवर्षे चालू आहेत हे लक्षात घेतले म्हणजे मन अश्चर्याने थक्क होऊन जाते. कारण सुमारे ३७-३८ नाटके व काही खंडकाव्ये यांवर अनेक ग्रंथालये भरतील इतके वाड्मय सारखे प्रसिद्ध होत राहावे यावरून शेक्सपिअरबद्दलच्या लोकांच्या भावना, त्याच्याबद्दलचा आदर व त्याची लोकप्रियता, यांची कल्पना येऊन तो एक अतिमानव असला पाहिजे असे वाटू लागते. जगातील कोणत्याही लेखकाबद्दल इतके अव्याहत लेखन अद्यापि तरी झाले नाही व होऊ शकेल असे वाटत नाही.